सनईचे मंगल सूर वगैरे काय म्हणतात ते मला कधीच नाही पटायचं. कदाचित लग्नमंडपातल्या गोंधळामुळे असेल पण सनई फारशी रुचली नाही. आज रस्त्यावरून जाताना , त्या गाड्यांचे horns, engine ची घरघर, कर्रर लागणारे brakes, ढाकचिक ढाकचिक करत जाणारी एखादी BMW, ढणाणा बोलणारी माणसं.. फोनवर बोलणारी, bargain करणारी, एकमेकांशी बोलणारी आणि त्यातूनच एखादं किरकिरणारं पोर..!! एवढा सगळा आघात झाला कानांवर, म्हणून वनदेवीच्या देवळात जाऊन बसले अन अचानक कुठूनतरी सनई कानाशी वाजली. एक आजोबा देवळाच्या पायथ्याशी बसले होते सनई घेऊन. का कोण जाणे पण आज ते सूर भावले.. काहीच क्षणांत त्या सुरांवर बसून मी वेगळ्याच जगात पोचले..
सूर.. केवढी ताकद आहे न सुरांमध्ये? बसल्या बसल्या हसवतील, रडवतील, गंभीर करतील तर कधी शांत करतील. मनाच्या आभाळात आठवणींचे ढग लगेच गर्दी करू लागतात या सुरांमुळे.. एखादा आलाप, एखादी तान अशी चढते कि त्या ढगांना थंडी वाजते, अंगावर शहारे येतात आणि नकळत पाण्याचा थेंब पडतो धरतीवर.. डोळ्यातून..!
हे घडायला मात्र वेगवेगळ्या रंगांचा फक्कड घाट जमला पाहिजे अगदी इंद्रधनुष्यासारखा.. गाणाऱ्याला गंधर्व म्हणावेसे वाटले पाहिजे, वाजवणारा तर देवदूतच वाटावा.. आणि हे सगळं एकत्र करून गाणं बनवणाऱ्याच्या हाती असावी जादूची छडी ! (बासरी मात्र जरूर असावी गाण्यात, जीवाचा अगदी कान होऊन जातो ऐकताना.) आणि मग त्या छडीवाल्याने हात उचलला रे उचलला कि सुरू व्हावी रंगांची उधळण.. हिरवा, पिवळा, निळा, लाल, नारिंगी.. फरकाटे उडावेत सुरांचे, तालांचे अन लयींचे. मोराच्या पिसाऱ्यागत मैफिल फुलावी. आपणही हरवून जावं. तरंगत रहावं.
जायचंय मला अशाच एका जगात जिथे असतील केवळ त्या चार की पाच रेषा आणि त्यावर लटकणारे ते musical notes.. एकेक रेषेवरून चालत जावं, उमटणाऱ्या प्रत्येक सुराबरोबर धुंद व्हावं.. आणि चालता चालता अलगद पडावं ते जागं व्हावं थेट पलंगावर..
ती सकाळ मात्र सुंदर असेल.. इमारतींनी सजलेल्या या जगात कोकिळेचा आवाज ऐकू यावा तशी..!!
No comments:
Post a Comment