पडदा उघडताच टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत झालं. संगीतातलं काही कळत नसलं तरी stage वर बसलेल्या व्यक्ती मागे असलेला aura च भारावून टाकतो . म्हणूनच उस्ताद झाकीर हुसैन यांना पाहून खूप "भारी" वाटत होतं. पडदा उघडल्यानंतर ते "धा धा तिरकीट" ऐकता ऐकता तास भर कसा निघून गेला ते कळलंच नाही.
मान डोलवत, केस उडवत उस्ताद आपल्याच नादात तबला वाजवत होते. वाजवता वाजवता छानसं हसून प्रेक्षकांची दाद मागत होते. मी मध्ये मध्ये डोळे मिटून ऐकत होते. कधी वाटत होत कुणी कथ्थक dancer त्या तालावर नाचतेय. कधी मीच रागारागात काही बोलतेय, तर कधी वाटत होतं पाऊस पडतोय.
थोड्याच वेळात त्यांनी डग्ग्यावर "ढूमढूम" वाजवायला सुरुवात केली. वाटू लागलं कि दूर कुठे तरी डोंगरावर आदिवासी जमून देवाची प्रार्थना करतायत. गोल उभे राहून ढोल बडवत काहीतरी मंत्र म्हणतायत.
मी पुन्हा डोळे मिटले आणि चक्क माझ्या समोर 'महादेवाने' डोळे उघडले. ढोलाच्या आवाजाने शंकर जागा झाला होता. त्यानं आजूबाजूला बघितलं, नुकताच पाऊस पडून गेला होता. त्याची आवडती बाग हसून डोलत होती. मग काय? उठलाच तो! डमरू घेतलं आणि डमडम वाजवत नाचू लागला. ह्या वेळी तांडव करत नव्हता तो, खुश होऊन नाचत होता. मग अचानक कुठुनसा शंखनाद झाला. मी पटकन डोळे उघडले तर… तर उस्तादजी चक्क तबल्यावर शंख वाजवत होते. खूप खूप उंच गेल्यासारखं वाटलं… बहुतेक कैलास पर्वतावरच!
तबला थांबला आणि पं. राकेश चौरासियांनी 'बागेश्री' चा "सा" लावला. आणि दोनच मिनिटांत मी रंगमंदिराच्या बाहेर कुठेतरी रानात जाऊन पोहोचले. धोती नेसलेला कान्हा बासरी वाजवत चालला होता. मी देखील त्याच्या मागे मागे फिरत होते. रानोमाळ हिंडलो आम्ही! त्या गोवर्धन पर्वतावर पण चढलो. तिथल्या गायींशी खेळत होते इतक्यात कान्हा कुठे गायब चा झाला. इकडे तिकडे नजर फिरवली तर सगळीकडेच दिसला! रुणुझुणु भ्रमरामध्ये, थुई थुई मोरामध्ये...
तेवढ्यात तबल्यावर थाप पडली आणि राधेचं पैंजण वाजलं. तबल्याच्या तालावर पाय टाकत ठुमकत ठुमकत ती आपल्या कृष्णाला शोधत चालली होती. लगेचच मधुर अशी बासुरी वाजवत कान्हा तिथे आला. काही क्षणातच तबला आणि बसुरीची जुगलबंदी सुरु झाली. जणू काही राधा कृष्णाच्या तालावर पाय थिरकवू लागली. त्याचं प्रेम पाहण्यात दंग झालेली मी टाळ्यांच्या कडकडाटाने जागी झाले.
काही वेळात भैरवी सुरु झाली. ही मैफिल थोड्याच वेळात संपणार ह्याची जाणीव झाली. रानावनात, पर्वतावर फिरलेलं माझं मन आता शांत शांत झालं. त्या भारलेल्या मैफिलीतून माणसांनी भरलेल्या गर्दीत परतत असताना एकच विचार डोक्यात होता. "आपण का नाही आपल्याकडच्या सुरांचं गाणं बनवत? सगळेच सूर आनंद थोडीच देतात? काही काळजात पण घुसतात, डोळ्यात पाणीदेखील आणतात. पण म्हणूनच तर मैफिल लक्षात राहते. म्हणून रोज 'मरण्यापेक्षा' थोडं जगूया, कारण आयुष्यातल्या मैफिलीत 'भैरवी' कधी आणि कशी वाजेल नाही सांगता येत."
No comments:
Post a Comment