Friday, 30 May 2014

सवत

            "काय खाऊन मस्तीला आलीस गं?" खणखणीत आवाजातला हा सवाल ऐकून सगळेच बाहेर धावले. आज्जीची आणि पसारेमावाशींची नजरानजर झाली. दोघींनी एकमेकींकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलंतेवढ्यात वंदना कमरेवर हात ठेऊन उभी असलेली दिसली.
           "माजं खाणं काडणारी तू कोन गं.. सटवे ..तुज्या बापाचं खाती का काय मी?"सरिता पण पदर खोचत ओरडली.
           "बापाचं नाव काडायचं कारण न्हाई सरे .. एवढं असलं तर तुज्या बापाला सांग घेऊन जायाला.. कशाला माज्या उरावर बसलीयास  हितं.. स्वत्ता बी जगात न्हाई मला बी जगू  देत न्हाई.. माज्या नवऱ्यावर भुरळ पडून आलीस ते आलीसआता मला घराभाईर काडाय निगालीस व्हय??"
           "मी कशाला काय करूतेंच तेनीच ठरवतील कुणाला ठेवायच अन कुणाला नाई. माजा काय दोष त्यांनी माज्याशी लगीन केलंतुमास्नी तर वर्षं झाली एक पोर काडता  यीना.."
           यावर मात्र वंदना भडकली. चप्पल घेऊन बाहेर आली. रप्पकन चप्पल हाणून म्हणाली, "तुज्या रुपड्याचा अन या पोरीचा तोरा दाखिवतीस.. पोरीचं हगणं-मुतन मी काढलंय.. कानामागणं आलीस आणि डोस्क्यावर चढाय लागलीस व्हय??"
           दोघींची चांगलीच जुंपली होती. शेवटी सवतीच होत्या त्या. दारुडा नवरा अन त्याच्या या दोन बायका.. - महिने झाले त्यांना आमच्या गल्लीत येऊन. कुलकर्णी काकींच्या  खोल्या रिकाम्या होत्यात्यात हे विचित्र जोडपं राहत होतं. वंदना आणि सरिता.. गोष्टीत असतात नाआवडती आणि नावडती बायकोतशाच  काहीश्या..
     वंदना रंगानं सावळी, थोडी काळ्याकडेच झुकणारी. हात काम करून घट्ट झालेले चरा पडलेले. प्लास्टिकच्या काळ्या चपलातून पायाच्या भेगाही लपत नव्हत्या. आणि याहून वाईट गोष्ट म्हणजे पाच वर्षं झाली वंदनाला मूल होत नव्हतं. सतत चेहऱ्यावर चिंतांच जाळं असायचं तिच्या.
 याउलट सरिता, गोरा रंग, नितळ त्वचा, निरम्यानं धुतल्यामुळे भुरकटलेले केस.. पण नाकेली आणि निमुळता चेहरा. सरिता नीटनेटकी रहायची. चोपून साडी..केसात एखादं फूल आणि Rexysnow थापायची चेहऱ्यावर. ती देखील ४ वेगळ्या घरची धुणी-भांडी करायची. सरिताची पोरगी पण गोड होती. "श्वेता" असं जरा modern च नाव ठेवलं होतं सरितानं तिचं.
            अशा या दोघी.. तसं बघायला गेलं कट्टर वैरीच पण एकाच चुलीवर जेवण करायच्या.. सरिता नेहमी 'ताईताई" म्हणत वंदनाच्या मागे पुढे असायची'भाजी कुठली करायची,श्वेताला शाळेत घालायचं का?अशा बऱ्याच गोष्टींमधे तिला वंदनाचा सल्ला हवाच असायचा. त्यामुळं गल्लीतल्या सगळ्याच घरांना यांचं अप्रूप वाटायचं. पण इतके दिवस धुमसत असलेला राग बाहेर पडलाच शेवटी. एकमेकींचे केस उपटतआई-बहिणी काढत दोघी तासभर भांडत होत्या. बिच्चारी श्वेता घाबरून कोपर्यात उभी होती. शेवटी मोका साधून सरिता पोरीला घेऊन घरात पळाली अन दार लावून घेतलं.
            वंदना तरीही बाहेर उभी राहून शिव्या देत होती. थोड्यावेळान दमून नाईक वहिनींच्या कट्ट्यावर जाऊन बसली. साहजिक बायका गोळा झाल्या.. कायकसंकुठंकधी असे प्रश्न तयार होते त्यांच्या मनात.. असं काही happening घडलं आणि आपल्याला ते कळलं नाही तर अगदीच हळहळ लागून राहते बायकांच्या मनाला.
            तिचं सांत्वन करीतपसारे मावशीखोपडे काकीनाईक वहिनीतलवारे भाभी आपल्याला हवी असलेली माहिती काढून घेत होत्या. फार कुणाच्या अध्यात-मध्यात नसलेली आमची आज्जी आणि कामत आज्जी दारातच उभ्या राहून जेवढं ऐकता येईल तेवढं ऐकत होत्या.
            वंदना आता रडकुंडीला आली होती. सरितानं मर्मावरच बोट ठेवलं होतं. तिच्या जखमेवर आज भरभरून मीठ चोळलं होतं'वंदना बाबूची पहिली बायको.. बाबूच्या नात्यातलीच. घरच्यांच्या दबावामुळं त्यांना हिच्याशी लग्न केलं पण पहिल्याच रात्री बाबूनं नाखुषी व्यक्त केली होती. वर्षभरातच बाबू सरिताला घेऊन आला. सरिताला तेव्हा सातवा महिना सुरु होता. तिच्यावर राग काढायचं सोडून वंदनाला तिचं बाळंतपण करावं लागलं होतं.डोळे पदरानं पुसत वंदना सगळं सांगत होती.
            बराच वेळ झाला वंदना घरात परत जात नव्हती. सरिताचं तोंड पण बघायची इच्छा नव्हती तिला. ऊन खाली होत आलं तशी वंदना कट्ट्यावरच आडवी झाली. एवढ्या सगळ्या त्रासामुळं तिला लगेच डुलका लागला.
            तेवढ्यात, "मोठ्ठी मम्मे..." अशी एक आरोळी ऐकू आली. श्वेता धापा टाकत टाकत वंदनाजवळ आली, "मम्मी.. ... मम्मी .. हिरीवर.. पडली.. पडली " तिचं तोडकं-मोडकं बोलणं वंदनाला लगेच कळलं. ती झटकन उठली आणि पळत पळत विहिरीवर जायला निघाली.. धुणं धुताना सरिताचा पाय घसरून ती विहिरीत पडली होती.. झाडाच्या फांदीला पकडून कसंतरी तगण्याचा प्रयत्न करत होती.
           वंदना दोन मिनिटात विहिरीवर पोचली. विहिरीत वाकून बघणाऱ्या श्वेताला तिनं मागं ढकललंसाडीचा काचा बांधला आणि "सरे... थांब गं तशीच आलो मी" अशी आरोळी ठोकून विहिरीत उडी घेतली.


No comments:

Post a Comment