कधीतरी संध्याकाळी, मावळत्या सूर्याच्या किरणांवर बसून
नेईन मी तुला माझ्या स्वप्नांच्या दुनियेत
नको घेऊ आढेवेढे
नको ठेऊ उरात कसलेच प्रश्न
फक्त चल माझा हात धरून
दिसतील मग वाटेत तुला
मी लावलेली स्वप्नांची रोपटी
स्वप्नांसारखीच सुंदर आणि बिनकामी
नको रे नको उपटू त्यांना
नको लाऊ खरेपणाची कात्री
फक्त गोंजार थोडंस आणि पाणी घाल ओंजळभरून
दिसतंय ना तुला
ते खळाळणारं निळंशार पाणी
नागमोडी वळणं घेत कसल्याश्या ओढीनं धावत जाणारं
नको ना घालू बांध
कसलाच, ना प्रेमाचा ना चिंतांचा
फक्त बस थोडावेळ थंड पाण्यात पाय घालून
थांब आता, नको जाऊ पुढे
तिथे आहे माझी फुलपाखरांची बाग
भिरभिरणारी, रंगीबेरंगी,
स्थिरतेची अपेक्षाच नसलेली
नको पकडू त्यांना तुझ्या घट्ट मुठीत
नको ठेऊ त्यांना बंद बाटलीत
बघत राहा रंग, आनंद, लहरीपणा
माझ्या डोळ्यात हि दिसेल तोच
फक्त बघ माझे डोळे पुसून…!
No comments:
Post a Comment