Thursday, 22 May 2014

म्हातारी

आज माझ्या वाढदिनी, उठले मी प्रातःकाळी
बाहेर अंधुकसा प्रकाश, सूर्यदेवाचे दर्शन जणू होता होता राहिले
सवयीप्रमाणे गेले मी पाहायला आरशात
पण उडाली माझी भांबेरी असे दृश्य मी पहिले

आरशात मला दिसली चक्क एक म्हातारी
शुभ्र केस, सुरकुतलेली जख्ख एक म्हातारी
भेदरलेल्या मला पाहून मिस्किल होती हसत
tracksuit घालून झाली होती ready

चक्कर येउन मी पडणार एवढ्यात धरला तिने हात
क्षणार्धात, मी होते आरशाच्या आत

दात पडका बोळकं हलवत म्हणाली मला म्हातारी
ठमे, आज तू मोठी झालीस म्हणे,
चल आज एक काम करू
आयुष्यात तुझ्या थोडी शतपावली घालू

काही कळायच्या आत, आम्ही पोचलो माझ्या जुन्या वाल्या घरात
तिथे दिसली मला इवलीशी पोर
निरखून पाहिले जरा तेव्हा आले ध्यानी
अहो, दुसरे-तिसरे कोणी नाही माझीच लहानगी प्रतिकृती

बसले होते मी भातुकली खेळत, मातीची भाजी आणि पानांच्या पोळ्या लाटत
प्लास्टिकच्या स्टेथोस्कोप ने बाहुलीला तपासलं,
स्वतःच तिची आई होऊन औषधही पाजलं
खेळता खेळता कुठेसं बोट कापलं, आणि मी जोरात भोकाड पसरलं

रडणाऱ्या मला पाहून होत होती माझी घालमेल
म्हातारी होती हसत उभी, जणू आहे सगळं आलबेल
थेट गेली मग तिच्याकडे, घेतलं कडेवर आणि म्हणाली,
"एवढ्याश्या जखमेला काय रडतेस सोने
मोठ्ठी होशील तसा अजून कापणार, टोचणार, खुपणार
इथे आपण औषध लाऊ, पण मनाला लागेल तेव्हा काय करणार?"

माझं रडू शांत होतंय तोवरच घेऊन निघाली म्हातारी
अजून खूप 'cover' करायचय म्हणाली

दिसली मला अचानक आठवी-नववीतली मी
रुसून एका कोपऱ्यात बसलेली मी
महिनो-महिन्याच्या वाऱ्या नुकत्याच झाल्या होत्या सुरु
"मलाच का?" हा अवघड प्रश्न घेऊन येत होतं रडू

म्हातारी गेली तिच्यापाशी, म्हणे डोक्यावर हात फिरवत,
"पोरी आत्ताच अशी रडत बसलीस तर कसं व्हायचं ?
निसर्गाच्या चक्रात आता कायमचंच अडकायचं
पण म्हणून का तू बसून राहायचं?
हे सगळं चालू असतानाच तुला आता पुढे जायचं"

गेलो मग तिथून आणि उभ्या ठाकलो एका hall समोर
चक्क होता तो माझा परीक्षेचा hall
दिसली मला मीच बेंचवर बसलेली
बोस्टन बंदरावरच्या हल्ल्याचं इसवी सन विसरलेली
दरदरून फुटला होता घाम, पेनची शाई नेमकी संपत आलेली

म्हातारी शिरली आत, थांबवत तिला म्हणलं,
अगं असं नसतं जायचं बोर्डाच्या परीक्षागृहात
डोळा मारून मलाच म्हणाली तू इथंच थांब
गेली थेट माझ्या बेंचवर बसली
पेपर मध्ये बघत म्हणाली,
"अगं मार थाप, कोण वाचतंय इथं ?
ह्याच थापांवर तर जगायचं तुला
खरेपणाला इथे आहे काडी एवढी किम्मत
खोट्याच्या आधारावरच वर चढायचं तुला"

असंच खूप फिरलो मग आम्ही
हॉस्टेल मध्ये सामान लावताना म्हातारी होतीच
कांदेपोहे नेताना म्हातारीनेच धरला लवंडलेला ट्रे
अक्षता होती टाकत लग्नाच्या बोहल्यावर उभी असताना
प्रेग्नन्सीच्या कळा सोसताना हात धरून होती
प्रत्येक ठिकाणी हेच होती सांगत,
"अजून पुढेच आहे ह्यापेक्षा मोठ्ठा त्रास, मोठ्ठी भीती, मोठ्ठा राग
असेल ताटात अपेक्षेपेक्षा नेहमीच मोठ्ठा घास"

शेवटी दिसली मला पन्नाशीतली मी
सगळं आटोपूनही स्वस्थ नसलेली मी
महिन्याच्या वाऱ्या संपल्या होत्या केव्हाच
पण त्रागा, अपेक्षा, दुःख मात्र अजून नव्हती संपली

आता मात्र म्हातारीने पिळला कान
म्हणाली तिला, "ठमे झालीच नाहीस अजून मोठ्ठी?
अक्कल नाही आली तुला इतक्या वर्षात
'ह्याला जीवन ऐसे नाव' चे गणित तुला कसे नाही समजले

पन्नाशीतही अशी स्थिती पाहून माझी मलाच वाटली लाज
म्हातारीने ते ताडले आणि म्हणाली
"अगं असंच असतं सगळयांच आयुष्य, म्हणूनच आहे तुझंही
तुला म्हणून वेगळी दुःखं नाहीत दिलीत की निराळी सुखं नाही मिळालीत"

शेवटी न राहवून मी विचारलं म्हातारीला,
"जर सगळ्यांचं आयुष्य असंच तर तू कशी खूश गं?"

तोंडाचं बोळकं अजून मोठ्ठं करत म्हातारी म्हणे मला,
"फार काही नाही केलं गं,
सगळ्यांसारखं जगता जगता मी माझं वेगळेपण जपलं,
वेळेनुसार कधी कधी बाजूला सारलं
पण जेव्हा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा आंजारलं, गोंजारलं
उत्तरायणात उभी राहून पाहते तेव्हा तेच मला खुलवतं
माझं वेगळेपण माझ्या ओठांवर हसू फुलवतं"

बोलता बोलता काही कळायच्या आत
मी होते आरशाच्या बाहेर आणि म्हातारी हसत आरशात
टाटा करून वळली इतक्यात पुन्हा मी टोकलं
"मला हे सगळं शिकवणारी तू, कोण ते नाही सांगितलं?"
मिस्किल हसत म्हातारी म्हणे मला,
"ठमे, शाळेत नाही का शिकलीस
आरशात तुला अजून कोण दिसणारेय?"


5 comments:

  1. खूपच छान "आम्रपाली", मस्त लिहिलय :)

    ReplyDelete
  2. Uttam! Vyakarniy sanskar kona janakarakadun karun ghech.

    ReplyDelete