Friday, 18 April 2014

# सूर-मयी #

         सनईचे मंगल सूर वगैरे काय म्हणतात ते मला कधीच नाही पटायचं. कदाचित लग्नमंडपातल्या गोंधळामुळे असेल पण सनई फारशी रुचली नाही. आज रस्त्यावरून जाताना , त्या गाड्यांचे horns, engine ची घरघर, कर्रर लागणारे brakes, ढाकचिक ढाकचिक करत जाणारी एखादी BMW, ढणाणा बोलणारी माणसं.. फोनवर बोलणारी, bargain करणारी, एकमेकांशी बोलणारी आणि त्यातूनच एखादं किरकिरणारं पोर..!! एवढा सगळा आघात झाला कानांवर, म्हणून वनदेवीच्या देवळात जाऊन बसले अन अचानक कुठूनतरी सनई कानाशी वाजली. एक आजोबा देवळाच्या पायथ्याशी बसले होते सनई घेऊन. का कोण जाणे पण आज ते सूर भावले.. काहीच क्षणांत त्या सुरांवर बसून मी वेगळ्याच जगात पोचले..  
         सूर.. केवढी ताकद आहे न सुरांमध्ये? बसल्या बसल्या हसवतील, रडवतील, गंभीर करतील तर कधी शांत करतील. मनाच्या आभाळात आठवणींचे ढग लगेच गर्दी करू लागतात या सुरांमुळे.. एखादा आलाप, एखादी तान अशी चढते कि त्या ढगांना थंडी वाजते, अंगावर शहारे येतात आणि नकळत पाण्याचा थेंब पडतो धरतीवर.. डोळ्यातून..!   
         हे घडायला मात्र वेगवेगळ्या रंगांचा फक्कड घाट जमला पाहिजे अगदी इंद्रधनुष्यासारखा.. गाणाऱ्याला गंधर्व म्हणावेसे वाटले पाहिजे, वाजवणारा तर देवदूतच वाटावा.. आणि हे सगळं एकत्र करून गाणं बनवणाऱ्याच्या हाती असावी जादूची छडी ! (बासरी मात्र जरूर असावी गाण्यात, जीवाचा अगदी कान होऊन जातो ऐकताना.) आणि मग त्या छडीवाल्याने हात उचलला रे उचलला कि सुरू व्हावी रंगांची उधळण.. हिरवा, पिवळा, निळा, लाल, नारिंगी.. फरकाटे उडावेत सुरांचे, तालांचे अन लयींचे. मोराच्या पिसाऱ्यागत मैफिल फुलावी. आपणही हरवून जावं. तरंगत रहावं.   
         जायचंय मला अशाच एका जगात जिथे असतील केवळ त्या चार की पाच रेषा आणि त्यावर लटकणारे ते musical notes.. एकेक रेषेवरून चालत जावं, उमटणाऱ्या प्रत्येक सुराबरोबर धुंद व्हावं.. आणि चालता चालता अलगद पडावं ते जागं व्हावं थेट पलंगावर..   
         ती सकाळ मात्र सुंदर असेल.. इमारतींनी सजलेल्या या जगात कोकिळेचा आवाज ऐकू यावा तशी..!!

Friday, 11 April 2014

# कातरवेळ #

     काय होतं तो सूर्य डोंगरा आड जाताना? सगळी strength घेऊन जातो का तो?? काठ्या जोडून , दगड लावून आधार दिलेल्या मनाला एका फटक्यात पाडून जातो. काय होतंय कळतच नाही, केवळ रडावसं वाटतं . आता संध्याकाळ होतेय या भावनेनेच ऊर दाटून येतो. डोळ्यात आठवणी साठू लागतात… कडू आठवणी, दुखऱ्या आठवणी… एकदम येतात, गर्दी करतात नेमकी कुठली जास्त दुखावतेय हे पण कळेनासं होतं.
     अपमान, भांडण, दुरावा… सगळं डोक्यात फिरू लागतं आणि मग डोळ्यात उतरतं. आपण कुठे आहोत,काय करत आहोत, कुणासमोर आहोत, कशाचंच भान नाही राहत… आठवणी फक्त वाहू पाहतात त्यांना परिस्थिती चा बांध नकोसा होतो.
      होतं असंच, बऱ्याचदा… खुपश्या संध्याकाळी… काय आहे माझं आणि त्या आभाळाचं नातं?? त्यालाही नाही आवडत कदाचित असं मध्येच अडकायला. त्याला एकतर सूर्य हवा नाहीतर चंद्र! कोणीच नसलं की ते कावरंबावर होऊन जातं, सुन्न होऊन जातं.  सूर्य असताना ते strong असतं. सुंदर निळा रंग लेऊन चमकत राहतं, पांढऱ्या शुभ्र ढगांबरोबर फेर धरून गाणी म्हणतं. आणि चंद्र असला की शांत असतं. काळ्या रंगाची गहराई घेऊन खोल खोल जातं. अथांग आणि प्रेमळ होतं, रातराणीसारखं सुगंधी होतं! पण त्याला हि मधली phase आवडत नाही.
      मला पण नाही आवडत शांत राहायला… वाट बघायला… हात सोडायला... पण उद्याची संध्याकाळ मी थांबेन. धावणार नाही, लपणार नाही. आभाळाकडे बघणार… सूर्याला सोडून देणार. चंद्राची वाट पाहणार. थोडाच वेळ आहे… मग फक्त प्रेम, चांदणं , शीतलता, वाऱ्याची झुळूक आणि निशिगंध… तो आणि मी … वाटून घेणार आनंद ,दुःख, प्रेम आणि शांतपणे डोळे मिटणार त्याच्या अथांग कुशीत…

Friday, 4 April 2014

मनातलं ऊन

           ऊन…  ऊन… कडाक्याचं. डोक्यावरचा सुर्य की डोक्यातला… त्याच्या किरणांसारखेच तप्त विचार… चटके देणारे, मनाची लाही लाही करणारे. तापतं डोकं मग ह्या विचारांनी. तापलेल्या जमिनीवर वारे वाहू लागतात, मैदानावर उभी राहून मी त्या वाऱ्याच्या झळा पाहतेय… अलीकडे पलीकडे, मागे पुढे वारं  पिंगा घालतंय. हळू हळू वावटळ तयार होतंय. गरम वारा, भोवतीची माती घेऊन गोल गोल गरागरा  फिरतोय… त्यात छोटे मोठे "का?" सापडले आहेत. नाचतायत डोळ्यासमोर… "हे असंच का?, ती अशीच का? त्याला का नाही?मला का नाही?किंवा मीच का?"…
           भांबावली आहे मी. "हे असं काय होतंय आपल्याला?" हे कळायच्या आधीच माती फेकली गेली डोळ्यात. आंधळी होतेय मी. क्रोधाने, मत्सराने, भीतीने… डोक्यात विचार, डोळ्यात राग. स्वच्छ काही दिसतच नाही.
          नको नको म्हणत मी डोळे धरून पळतेय. भोवरा मागे येतोच आहे. असा कसा थांबेल? असे कसे हे "का?" माझी पाठ सोडतील? पण नाही… मला नाही त्यात अडकायचं. डोळ्यात कचकच, घळाघळा पाणी वाहतंय डोळ्यातनं. मला त्या वादळाला शमवलं पाहिजे. काय करू? कसं थांबवू?
           पाण्याचा नळ सोडला. अख्खी बादली रिकामी केली डोक्यावर. डोळ्यात पाणी मारलं. खुपश्या बादल्या रिकाम्या केल्या डोक्यावर. आता जरा शांत वाटतंय. पाण्याबरोबर राग, भीती, असूया हळू हळू वाहून जातायत. नळातून खाली पडणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकतेय मी. कशासाठी हे वादळ? कशासाठी ते भरमसाठ प्रश्न? डोक्यात गोंधळ घालू पाहणाऱ्या एका  एका  प्रश्नाकडे, एका एका विचाराकडे तिऱ्हाईत म्हणून पाहतेय मी. ह्यातल्या किती जणांवर माझ्याकडे तोडगा आहे? कित्येक तरी नुसतेच इतरांच्या खोडावर बांडगुळासारखे वाढलेत. कात्रीच नाही लावली त्यांना तर वाढणारच ते. खत, पाणी, अगदी  तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतेय मी ह्या विचारांना.
            घेतलं मी खुरपं, कुदळ आणि खोरं… सटासट उपटतेय एकेकांना. मी नाही आता उगू देणार ह्यांना, नाही येऊ देणार वादळ… आनंदी कावळा आठवतोय, 'काट्याने कान टोचुया बाबा' म्हणणारा… मी पण आनंदी कावळा होणार. चिखलात फेका नाहीतर गरम तेलात… मी कशातही उभी राहणार. पंख पसरणार.
          वादळ थांबलं, पाण्याचा एक थेंब पडला चेहऱ्यावर… खूप सारे पडले मग. मातीचा तो सुंदर वास आला. छाती भरून वास घेतला… पहिला पाऊस. पंख पसरले मी. आता वळचणीला नाही थांबणार, अंग चोरून नाही जगणार. पावसात भिजणार… इंद्रधनुष्यात जाऊन येणार माझ्या काळ्या पंखावर रंग भरायला.

…त्याची वंदावी पाऊले!!

    "जग आता मंगळावर देखील जायला निघालेलं आहे आणि आपण अजूनही ह्या रूढी परंपरांच्या गुंत्यात अडकून बसायचं? जगात बदल करायचा असेल, तर त्याची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. रोज तुम्ही वर्तमानपत्रात वाचताच आहात, Global warming, प्रदूषण, प्लास्टिकचा अति वापर…. आणि ह्या सगळ्याला हातभार म्हणून आपण दरवर्षी गणपती बसवतो. एकमेकांच्या इर्षेने मोठमोठाल्या, रंगीत-संगीत मुर्त्या आणतो आणि पाच दिवसात? हे सगळं  पाण्यात! आपणच स्वतःसाठी एक खड्डा खोदत आहोत अस वाटत नाही का तुम्हांला?"
     "अहं… मी म्हणत नाही कि तुम्ही तुमच्या श्रद्धा, संस्कृती विसरा… आता आमची सौ. रोज देव्हाऱ्यासमोर तास भर वाया घालवतेच. हॅ.. हॅ.. हॅ..! पण मला म्हणायचं आहे कि जरा डोकं वापरा. देव तुम्हाला हे सांगतो का की नद्या, विहिरी घाण करा?  मोठमोठ्याने गाणी लाऊन इतरांना त्रास द्या? लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणपतीचा मुख्य हेतू काय होता? त्या निमित्ताने तरुण मतं एकत्र येतील, त्यांच्यात विचारविनिमय होईल. आपण हा हेतू पूर्णपणे विसरून केवळ कर्मकांड आणि करमणूक ह्याकडे वळलो आहोत. म्हणूनच आज आपण 'परिवर्तन' मित्र मंडळाची स्थापना करत आहोत. ह्या गणेशोत्सवात आपण आपल्या कॉलोनीचा एकच गणपती बसवणार आहोत. सगळेच सण सार्वजनिक साजरे होतील, त्यामुळे खर्च कमी, प्रदूषण कमी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे… "
     खरंच जग खूप पुढे गेलंय. RJ  काका बरोबर होते, आपल्या देशात धर्म, जाती, सण-वार याचं केवढं अवडंबर माजवतात. खुराड्यातून बाहेर पडलं की कळतं, बाहेर किती वेगळे लोक आहेत. सगळ्या गोष्टींना किती वेगळ्या perspective ने बघतात. माझ्या group मध्येच किती प्रकारचे लोक आहेत. पण केवढा आदर आहे सगळ्यांना एकमेकांबद्दल. Germanyत शिकायला जाऊन दोन वर्षं होत आलीत. ह्या दोन वर्षांत केवढ्या गोष्टी बदलल्या. 'मी' किती बदलले. चार लोकांमध्ये English बोलायला घाबरणारी मी आता मराठीच विसरते की काय अस वाटतंय. पहिल्यांदा तिथे गेले तेव्हा किती भांबावलेली होते मी. छोट्या कपड्यातल्या मुली सहजपणे आजूबाजूला वावरताना पाहून मी पहिले काही दिवस पूर्ण कपड्यातही अंग चोरून चालायचे. आणि आज सहा हजार कि.मी.चा प्रवास एकटीने करतानाही काही वाटत नव्हतं.
     बसमध्ये बसल्या बसल्या मी विचार करत होते, माझं  गाव ही बदललं  असेल नई? नवीन रस्ते, नवीन घरं, नवीन  माणसं. माणसंदेखील बदलली असतील का? विचार करता करताच गावातल्या बस stand वर पोहोचले. बस मधून उतरताच कोपऱ्यातली भरून वाहणारी कचराकुंडी आणि त्यात बसलेलं  ते कुत्रं पाहताच माझा विरस झाला.
     अरे! काहीच नव्हतं बदललं…. तेच ते ओबडधोबड रस्ते… वाटेत काही दोन चार किराणा stores आणि medicals ची तेवढी वाढ झाली होती. बाबांची scooter अजूनच वाजत होती. गल्लीत शिरल्यावर जरा छान वाटलं… तो वडाचा  पार… केवढ्या उड्या मारायचो आम्ही…. शुभमदादा आणि मी गोल-गोल उंदीर मांजर खेळायचो.  इथे बाबा आणि गल्लीतले काका लोक संध्याकाळी बसून 'राजकारणाच्या' गप्पा करायचे…
     नवलेकाकूंचा कट्टा! ह्या कट्ट्यावरून कोलमडून मी डोक्याला खोक पडून घेतली होती… दोनच वर्ष झाली पण कित्ती वेगळं वाटतंय आज गल्लीत शिरताना. RJ काकांचा बंगला! अजून रंगरंगोटी केल्यामुळे छानच दिसत होता. बंगल्यासमोरून जातानाच ठरवलं, संध्याकाळी जायचंच आहे RJ काकांकडे.
     शेवटी एकदाची घरासामोर scooter थांबली. आई आणि नवलेकाकू दारातच उभ्या होत्या. हातात भातमुटके अन आरती घेऊन आई थांबली होती. माहेरवाशिणी  सारखं  ओवाळून मला घरात घेतलं, चेहऱ्यावर हात फिरवून कानशिलावर बोटं मोडली. कशी काय आज अगदी कडाकडा वाजली, नाहीतर आईची माया तशी दादावरच जास्त. आईला मिठी मारली, खूप लहान असताना आईच्या पदराचा जसा वास यायचा तसाच आला आजपण! खूप खूप वर्षांनी घरी आल्यासारखं वाटलं.
     जेवता जेवता गप्पा मारत असताना लक्षात आलं, गाव तर नाहीच नाही पण आई बाबा देखील बदलले नाही आहेत.
     "शुभमचं झालं की लगेच हिच्यासाठी बघायला सुरु करू" इति आई.
     "अगं, हिचं शिक्षण पूर्ण करायलाच पाण्यासारखा पैसा जातोय. लगेच कशी जोडणा करता येईल?"
     "अहो, बघायला सुरु करूयात म्हणतेय मी! आता आधीच एवढं शिक्षण म्हणाल्यावर तिला साजेसा मिळायला नको का? बाईसाहेबांच्या अपेक्षा पण वाढल्या असतीलच ना?"
     आई बाबांच्या ह्या discussion मध्ये मला अजिबात रस नव्हता. तसही मी काही सांगितलेलं ह्यांना पटणार नव्हतं. ‘दिघें’च्या घरात आजोबांच्या नंतर माझ्या इतका हट्टी प्राणी अजून तरी जन्मला नाही अस समस्त दिघे मंडळींचं मत आहे. त्यामुळे साहजिकच मी आत्ता काही बोलणे, म्हणजे वादाला तोंड फोडणे. होणार होतं .
     सगळे म्हणायचे मी आजोबांसारखी झालीय स्वभावाने! दादा मोठ्ठा असला तरी 'दादागिरी' माझीच चालायची. सतत कुठेतरी धडपडून येणे, कुणाशी तरी भांडून काढून येणे, मग त्याबरोबर घरात तक्रारी, हे तरी नियमितच होतं… नेहमी दादाचं उदाहरण देऊन मला त्याच्यासारखं बनवायचा “फोल” प्रयत्न खूप जणांनी केला. चार लोकात गेल्यावर "आमचा शुभम फार गुणी पण गायू एकदम हट्टी झालीय बघा, ऐकतच नाही" हे आईच वाक्य ठरलेलंच असे.
    "गायत्री !" मला तर माझं नाव देखील आवडत नसे… पहिला मुलगा झाल्यावर मुलगी व्हावी म्हणून आईनं गायत्री चालीसाची पारायणं केली होती, म्हणून मग माझं नाव 'गायत्री'!
     देवाधर्माचं करायला ना! घरकाम ना! खायला, प्यायला चांगलं हव. कुठली गोष्ट पटली तरच करायची, नाहीतर ढुंकूनही पाहायचं नाही. आज्जी तर म्हणायची "म्हाताऱ्याच्या पायावर पाय ठेऊन आली बघ ही." आजोबांना मी कधी प्रत्यक्ष पाहिलं नाही. पण मला ते नेहमी RJ  काकांसारखे असतील अस वाटायचं.
     RJ  काका म्हणजे रामदास विष्णुदास जोशी. विष्णूदास हरिदास जोशी यांचे सुपूत्र. शरीरयष्टी तशी साधारणच पण धारदार आवाज, घारे डोळे आणि कोकणी काटकपणा! RJ  काका आमच्या गल्लीत आले तेव्हा मी तिसरी- चौथीत असेन. RJ  काका पेशाने civil engineer, पण साहित्य, समाज आणि राजकारण ह्या एकदम जिव्हाळ्याच्या गोष्टी! त्यांचं आणि माझं झक्कास पटायचं. माझ्या आगाऊपणाला खुपदा तेच पाठीशी घालायचे. MS ला जायच्यावेळी पण त्यांनी आई बाबांना खूप समजावलं होतं.  
     RJ काका, देवाधर्मात बिलकुल interest नसलेला माणूस! ते नेहमी म्हणायचे "सगळं देव घडवुन आणतो म्हणणारे भ्याड आहेत. स्वतःच्या अंगात हिम्मत नसल्यामुळं केल्या नसलेल्या गोष्टींना देवाच्या नावाचं पांघरूण चढवतात हे लोक"
     आमच्या घरी सत्यनारायण होता त्यावेळी आईला, “वाहिनी plate भरून शिरा काढून ठेवा, प्रसाद काही मी घ्यायला यायचा नाही” असं सांगून गेले होते.
     एकदा एकांच्या कार्यक्रमात गेलो होतो तेव्हा RJ काकांना कुणी प्रश्न केला, "तुम्ही देशस्थ ना?" तेव्हा एकदम चिडून ते उत्तरले, "अहो, खरंतर  मी खालच्या जातीचा आहे. तुमच्या सारख्यांत मान मिळावा म्हणून आडनाव बदलून घेतले. आता बोला इथून पुढे तुमच्या दारात पाणी प्यायला थांबायचे की नाही?" सातवी-आठवीला असेन मी, पण त्या वाक्याचा केवढा परिणाम झाला होता माझ्यावर! एरवी ‘नदीमा’च्या जवळ पण न बसणारी मी दुसऱ्याच दिवशी माझा डब्बा share करायला गेले होते.
     एकदा मी त्यांना विचारलं होतं, "देव खरोखर आहे की नाही?" त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर अजूनही जसच्या तसं लक्षात आहे माझ्या.
     "बाळा देव आहे की नाही ह्यापेक्षा माणूस कसा आहे ह्याला महत्व आहे. दगडाच्या मूर्तीत आणि देवळात देव असता तर मग देवळाच्या जवळ भिकारी का बसतात? देवाने का नाही त्यांना काम दिलं? हे सगळ देव करत असता तर मग सगळेच श्रीमंत नसते का? ही केवळ कर्माची फळं. माणसाने कष्ट केले तर पैसे मिळणार, खायला मिळणार, रहायला मिळणार. म्हणून देवाला शोधण्यापेक्षा आपण काय कर्म करतो ते पाहिलं पाहिजे.    तुला काय वाटतं? किती लोक श्रद्धा आणि भक्ती म्हणून देवाला पूजतात? माणसं आपल्या सोयीपुरता देव उभा करतात. देवाच्या नावाखाली वाट्टेल तसं वागतात. दंगे करतात, माझा देव श्रेष्ठ म्हणून एकमेकांच्या जीवावर उठतात. पण देव जर खरंच असेल तर हे सगळं तो पाहतच असेल ना? मग त्याला आवडेल का आपल्या नावाचा असा ढोंगी वापर केलेला? त्याला आवडेल का, त्याच्या नावाखाली रक्त सांडलं तर? त्याला नाहीच आवडणार जर आपण म्हणलो ' असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' त्याने तुम्हाला हात-पाय दिलेत, बुद्धी दिलीय आणि तो तुमच्यावर सोडून दिलंय कसं  वागायचं.  तू चांगलं वागलीस तर तुझा देव पाहतच असेल… आणि तू वाईट वागलीस तरी पण पाहत असेल. आणि मग त्यानुसार तुला तो बक्षीस देईल किंवा शिक्षा देईल…. म्हणून जास्तीत जास्त बक्षीस मिळव. देव आपोआप मिळून जाईल."
     काका जेवढे dashing तेवढ्याच निर्मालाकाकू साध्या. श्रद्धाळू होत्या पण नवऱ्यामुळं त्यांना फार काही करण्याची मुभा नव्हती, मग आमच्या घरच्या देवकार्यात मदत करायला पहिल्यांदा तयार असायच्या. त्या सगळ्या लहान मुलांचे खूप लाड करायच्या. आणि खूप खाऊ द्यायच्या.  आज काकूंच्या हातचा special मोरावळा पण खायचा होता
     संध्याकाळी काकांना भेटायला निघालेच. केवढ्या गोष्टी सांगायच्या होत्या त्यांना. Germanyत काढलेल्या फोटोंचा अल्बमच घेऊन निघाले. अल्बम मधला एक फोटो पट्कन पाहून घेतला. सगळे होते त्यात, वेड्याप्रमाणे जुने music albums जमा  करणारा Andy, Amazon च्या जंगलात एकटी research साठी जाऊन आलेली Freya, Science म्हणजे जीव की प्राण असणारा Yousuf… आणि Louie! Louie नक्कीच RJ काकांना आवडणार होता. वेगळीच अशी excitement होती त्यांच्या घरी जाताना, कसलीशी भीती पण वाटत होती.

    "काका…." हाक मारतच मी त्यांच्या घरात शिरले.
    "अगं बाई, आलीस का गायु?" म्हणत काकू बाहेर आल्या. "अगं गणपती मंदिराकडे फिरायला गेलेत ते. बस येतीलच एवढ्यात. चहा ठेवते मी. घेशील ना?"
     माझा होकार गृहीत धरून काकू kitchen मध्ये शिरल्या सुद्धा. आतूनच त्यांनी माझी विचारपूस सुरु केली. मी पण ओरडूनच सगळी बातमी देत होते.
     आज त्या प्रशस्त हॉल मध्ये मला कोंडल्यासारखं होत होतं. धुपाचा वास, भिंतीवर "निलाराम बाबांचा" फोटो! सगळंच अनोळखी, नकोसं… इतक्यात 'राज' बाहेरून आला. 'राज', RJ काकांचा एकुलता एक मुलगा. आपल्या घरातील "दासांची" परंपरा मोडून  त्यांनी ह्याचं नाव 'राज' ठेवलं  होतं. राज शुभमदादा सारखाच होता त्यामुळे मला त्याच्यावरही दादागिरी करायला यायची. खूप खेळायचो आम्ही, नवले काकूंच्या कट्ट्यावर झालेल्या अपघाताचा तो एकमेव साक्षीदार होता! राज अभ्यासात जरा कमी असल्यामुळं काका सारखे त्याला रागवायचे. परीक्षेला जाताना काकांची नजर चुकवून तो देवाच्या पाया पडे, आणि "मला पास कर' असं  सांगे .
दोन वर्षांनी बघत होते त्याला, असा का दिसत होता? निस्तेज, खोल डोळे… काहीतरी मोघम बोलून आत निघून गेला. 
अचानक शिरशिरी आली अंगात… पटकन उठले. "नंतर येते काकू… " म्हणून झपाझप घराकडे निघाले.
     भाजी निवडता निवडता आईला विचारलंच, "राजला काय झाल ग आई?"
     "अगं काय सांगू… अभ्यासात तसा कमीच होता. मग हा आपला नाटकात काम कर, कुठे गाण्याचे कार्यक्रम कर…बापाचं काही लक्ष नाही पोराकडे. मग काय ग… एक दिवस आला ना एका मुसलमान पोरीला घेऊन दारात. म्हणे तिच्याशी लग्न करायचंय…. बाप मारे बढाया मारायचा… अंगाशी आल्यावर बरोबर line वर आला. तिला पुन्हा भेटलास तरी दोघांना उभं जाळीन म्हणाला. मग काय…. पोरीचं भूत काढावं म्हणून देवदर्शनं करून झाली… सहा महिन्यापूर्वी नात्यातल्याच पोरीशी बाशिंग फाडून झाले मोकळे…केवढा तमाशा गल्लीत! आजकालच्या पोरांना पण नसती अवदसा सुचते. प्रेम करतात म्हणे…."
     "दोघांना उभं जाळीन" हेच अजून माझ्या कानात घुमत होतं.… आई त्यानंतर काय बोलली ह्याकडं माझ लक्षच नव्हतं.
      तिथून उठले न गच्चीवर गेले… सूर्य मावळला होता. नुसतंच लाल आकाश…. मला कसंतरी वाटत असलं कि मी आमच्या गच्चीवर येते…. थोडा विचार करते…. मोठ्ठा श्वास घेते आणि जोमाने कामाला लागते. आज पण छान नव्हतं वाटत… काय सांगणार होते मी कुणाला? मी जिथे राहते तिथल्या गोष्टी, मला आवडणारा तो फ्रेंच मुलगा…कुणालाच नाही कळणार ना? कधीच नाही… !"
      मोठ्ठा श्वास घ्यायचा प्रयत्न केला… पण उगीच धुपाचा वास आला अन गुदमरल्यासारखं  झालं. अल्बम मधला एक फोटोदेखील चुरगाळला!