Monday, 16 June 2014

पिंजऱ्यातला पक्षी

मंजूळ स्वरात गाणे गातो
पिंजर्‍यातला एक पक्षी
उंच बंगल्याच्या अंगणात अडकवलेल्या
पिंजर्‍यातला एक पक्षी

कधी पंख पसरवले नाहीत
ना कधी आकाशी घेतली झेप
कधी घरटं नाही बांधलं
ना कधी दाण्यासाठी वणवण

देखणं रूप, गोड गळा
अन पेरुच्या फोडीसाठी फसलास
आयत्या मिळणार्‍या दाण्यासाठी
गजाआड जाऊन बसलास

कौतुक फार करतात मालकिणीच्या मैत्रिणी
मालक मारतो बढाया तुझ्या दुर्मिळ जातीची
गाणं म्हणता तू रडणे पोराचे थांबते
मग बक्षिस म्हणून तुला आणखी एक पेरुची फोड

पारतंत्र्याच्या पिंजर्‍यातही
तू सुखी कसा काय रे
पंख बांधले असता तुला
गावेसेच कसे वाटते

म्ह्णाला मग खाली बघत
पिंजर्‍यातला तो पक्षी
गात नाही मी मालकासाठी
ना ही मालकिणीच्या कौतुकासाठी
गातो मी माझ्या प्रियेसाठी

कुठल्यातरी जंगलात विहरत असेल ती
झाडावर एखाद्या बांधलं असेल घरटं
तिच्याबरोबरच तिच्या पिल्लांनी घेतली असेल आकाशी झेप
मी सांगतो तिला माझी ख्याली-खुशाली
जरी माहीत आहे मला
तिला कधीच ऐकू नाही गेली

गातो मी त्या झाडांसाठी
त्या घरट्यासाठी जिथून मी पहिल्यांदा जग पाहीलं
त्या जंगलासाठी ज्याने मला वाढवलं
त्या खळाळणार्‍या नदीसाठी
तो पिंजरा दिसूनही जी मूक राहिली

सांगतो मी सर्वांना माझी गोष्ट
पंख जरी आहेत माझे बंध,
माझ्या स्वरांना नाही कसलाच बांध
गात नाही मी पेरुच्या फोडीसाठी
ना ही वाटीभर दाण्यांसाठी
पारतंत्र्याच्या पिंजर्‍यात राहून
गातो मी स्वातंत्र्यासाठी!

2 comments: