Sunday, 23 July 2017

सादाकोची गोष्ट

"कधीपासनं शोधतोय मी तुला. इथंच काय बघत बसलीस?" पाटील सर, काचेच्या आत ठेवलेल्या तलवारींकडे बघण्यात गुंग असलेल्या आमूवर खेकसले.
"मी ती माहिती..."
"चल आता माझा हात सोडलास तर बघ."  असं म्हणून त्यांनी तिच्या छोट्या दंडाला पकडलं आणि तरा-तरा चालू लागले. "एका एका ठिकाणी थांबलं तर कसं होणार सगळं म्युझियम बघून?"
"असं बघून तरी काय उपयोग आहे!" आमू स्वतःशीच पुटपुटली. पाटील सरांबरोबर तिला पळावं लागत होतं. 'छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय' बघण्यापेक्षा ते 'कव्हर' करून परत मुंबई-दर्शन च्या गाडीत जाऊन बसतो', हा शुद्ध हेतू ठेऊन पाटील सर आमूला घेऊन बाहेर पडले होते. आमूच्या बाबांनी पूर्वी ते बघितल्यामुळे, "पाटील सरांबरोबर जा..." असं सांगून तिला धाडलं होतं.
'अखिल भारतीय विज्ञान संमेलन' साठी प्रत्येक जिल्ह्यातून काही शिक्षक आणि त्यांच्या मुलांना (प्रत्येकी एक) निमंत्रण होतं.  बाबा आमूला घेऊन गेले होते. एकूण ३ दिवसांची ट्रिप होती. कुठल्या तरी बऱ्यापैकी हॉटेल मध्ये राहायची व्यवस्था होती. १८ मजली इमारत आमूने तेव्हा पहिल्यांदाच पाहिली होती. ऑडिटोरिअम मध्ये सायंटिस्ट लोकांचे लेक्चर्स चालायचे. ३ पैकी एक दिवस "Bhabha Atomic research center" ला भेट होती,जिथे लहान मुलांना आणि म्हाताऱ्यांना प्रवेश नव्हता, त्यामुळे तिचा एक दिवस बोअर होण्यात गेला. तिथल्या बाकीच्या मुलांशी बोलायची आणि मैत्री करायची तिच्यात हिम्मत नव्हती (तिला हत्ती आणि मुंगीचे ३-४ जोक सोडल्यास चांगले जोक्स पण येत नव्हते)
दुसऱ्या दिवशी ही 'मुंबई-दर्शनची' पायपीट. तिसऱ्या दिवशी अजून कसलंतरी संमेलन. आमू त्या वरा-वरा फिरण्याला चांगलीच वैतागली होती.
त्यात "म्हातारीचा बूट" हा काहीही जादुई बूट नसून केवळ बुटाच्या आकाराची इमारत आहे हे बघून तर ती फारच disappoint  झाली होती.  तिला हॉटेलात पोहचल्यावर लिफ्ट मधून वर जाताना मधेच 'डॉ. गोवारीकर' चढले, त्यांनी तिला बघून 'हाय' पण केलं. पण "She was done with the day!"

शेवटी रूम मध्ये जाऊन ती मुसमुसू लागली. पाय दुखत होते, थोडासा ताप आला होता. महत्वाचं म्हणजे "मूड गेला होता!"

बाबांनी हळूच एक पुस्तक काढलं, ओरिगामीचं. खालीच लागलेल्या प्रदर्शनात घेतलेलं. ते आमुसमोर ठेवलं आणि ते म्हणाले,

"तुला सादाको सासाकीची गोष्ट माहितीय?"
"नाही." गालावरचे छोटे २ थेंब तिने पुसले.
"जपान मध्ये हिरोशिमा-नागासाकी हल्ला झाला होता बघ?"
"हां... अणुबॉम्बचा!"
"हां... तर त्या हल्ल्यानंतर खूप वर्षांनी सुद्धा लोकांना 'रेडिएशन' मुळे त्रास होत राहिला.
"रेडिएशन म्हणजे?"
"रेडिएशन म्हणजे, अणुबॉम्ब टाकल्या नंतर खूप दिवस त्यातून एक प्रकारचे किरण बाहेर पडत राहतात. त्या किरणांच्या जवळ आलं तर ते सरळ आपल्या शरीरावर परिणाम करतात आणि आपल्याला असे आजार होतात कि ते बरेच नाही होऊ शकत."
"बापरे... मग?"
"मग एक सादाको नावाची मुलगी होती, जपान मध्ये. तुझ्याएवढीच. तिला असा आजार झाला होता."
"मग?" पायाचं दुखणं ती विसरली होती.
"मग... अश्या आजार झालेल्या सगळ्या लोकांना एका हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आलं होतं. तर तिथे तिला पण एका कॉटवर झोपवण्यात आलं होतं." बोलता बोलता बाबांनी ते पुस्तक उघडलं आणि जवळच असलेला साधारण ४ इंचाचा कागदाचा तुकडा उचलला.
"मग?"
"मग बिचारी सादाको... तिला फार वेदना व्हायच्या. पण तरी सादाको रडकी नव्हती. ती सहन करायची. तिथल्या नर्स बायकांना ती आवडली होती. पण सगळेच तिच्या बद्दल हळहळायचे (बाबांचं ड्रॅमॅटिक व्हर्जन!). ती आता काहीच महिने जगणार होती. एवढ्या गोड आणि लहान मुलीला असा त्रास होताना बघून सगळ्यांना खूप वाईट वाटायचं." गोष्ट सांगता सांगता  पुस्तकात बघून बाबा कागदाला घड्या घालत होते.
"मग काय झालं?"
""मग तिथल्या नर्सने तिला जपानमधली एक प्रथा सांगितली, 'जर एखाद्या व्यक्तीने ओरिगामीचे १००० क्रेन्स बनवले, तर त्याने मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण होते.' हे ऐकून सादाकोच्या चेहऱ्यावर छोटंसं हसू पसरलं. तिने लगेचच ओरिगामीचे कागद मागवले. आणि क्रेन्स बनवायला सुरुवात केली. पण तिने स्वतःसाठी काही मागितलं नाही, तिने 'जगाच्या शांती'साठी ते क्रेन्स बनवायला घेतले. युद्धामुळे लोकांचं आयुष्य उध्वस्त होतं, जसं आपलं झालं तसं पुन्हा कुणाचं होऊ नये म्हणून तिने क्रेन्स बनवायला घेतले (ड्रॅमॅटिक व्हर्जन!). पण तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती, शेवटी ती ६६४ क्रेन्स बनवू शकली आणि ती देवाकडे गेली."
बाबांनी आमूकडे बघितलं, तिच्या डोळ्यांत पाणी तरारलं होतं.
"हे बघ आता ह्या शेवटच्या दोन घड्यांमध्ये ह्या क्रेनचं डोकं तयार होईल." बाबा हातातला कागद दाखवून पुस्तकात बघून म्हणाले. त्या ४ इंची कागदापासून त्यांनी छोटा पोस्टकार्ड होल्डर बनवला होता. त्या होल्डरच्या मध्यावर एक क्रेनचं डोकं तयार होणार होतं.
"पण हा कागद इतका लहान आहे. नाही होणार बहुतेक"
"होय... खूपच लहान आहे कागद." आमू पुस्तकातल्या स्टेप्स बघून म्हणाली.
"चल आपण प्रयत्न करू. जर सादाको आपल्याकडे आता बघत असेल... तर हा क्रेन बनेल." बाबांनी सावकाश त्या ३ घड्या घातल्या आणि चक्क करंगळीच्या नखाएवढा तो क्रेन तयार झाला. आमूचे डोळे चमकले! तिला खूप आनंद झाला, ती चवड्यावर उड्या मारू लागली. बाबांनी ते कार्ड होल्डर मग पुस्तकात ठेऊन दिलं.
गादीवर आडवं पडून छतावर फिरणाऱ्या फॅनकडे बघत आमूने बाबांना विचारलं, "बाबा, कुणीपण १००० क्रेन्स बनवले तर जगात शांतता येईल?"
"मनापासून मागितलं तर येईल!"
"हां... मला घरी गेल्यावर क्रेन्स बनवायला शिकवा."

Sunday, 4 June 2017

चिंगी

"आणि खूप मोठ्ठा पाळणा होता विनूमामा... तू आहेस बघ... तुझ्या तिब्बल मोठ्ठा. " चिंगी आपले छोटे हात उंचावून उंचावून आपल्या किनऱ्या आवाजात सांगत होती.
"चिंगे... हात धर बघू... ते बघ रिक्षा आली."
"तू असतास तर तू घाबरून रडलाच असतास... खरं मी नै घाबरले..." माझ्या कमरेपर्यंत पण उंची नसलेली पोरगी मला भित्रा ठरवून मोकळी झाली होती. तसा मी त्या giant wheelला  घाबरतोच म्हणा. वरून खाली येत असताना पोटातले जठर, यकृत जे काही असेल ते अन्न-नलिकेतून बाहेर येईल असा वाटतं.
"अगं ... थांब..." मी किंचाळलो. चिंगी एकटीच रस्ता क्रॉस करू पाहत होती. मी धावत जाऊन तिला मागे ओढलं. "चिंगे... हात धर म्हणलं ना? का देऊ दोन फटकेतुझी आई मला जिवंत ठेवायची नाही तुला काय झालं तर." तिला मी कडेवर घेऊ पाहत होतो पण ती येत नव्हती. शेवटी तिचा हात घट्ट धरला आणि  मी रस्ता क्रॉस करू लागलो.
"मला काई नाई होत."
"मोठ्ठी आली... मला काई नाई होत"
"माझा हात सोड..." रस्ता क्रॉस झाला झाला तोवर पळायची घाई.
ह्या चिंगीच्या घरी जाणं म्हणजे एक टेन्शनच. आमच्या घरातलं कोणीही दिसलं कि मागे लागायची 'घरी घेऊन चल'. वर्षांची असल्यापासून. अगदी लहान होती तेव्हा पासूनच एकदम हरवाळ. एका ठिकाणी थांबायला तिला अजिबात जमत नाही आणि सांभाळता सांभाळता आम्हाला नाकीनऊ येतं. आमच्या घराच्या इथून ट्रेन्स दिसतात, त्याचं तिला फार कौतुक. शिवाय माझ्या आईची लाडकी! गोंडस चेहऱ्याची चिंगी आमच्या घरातल्यांचं एंटरटेनमेंटतिच्या गोष्टी, तिची सगळ्या कामात पुढे पुढे करायची घाई, सगळंच एकदम गोड.
"पळू नकोस गं बाई... मी नाही बघ उचलणार पडलीस तर. तुझा समोरचा एक दात आधीच पडलाय. अजून एखादा पडला तर बस रडत"
"मी नैच पडत." तिने पुन्हा एकदा मला धुडकावलं. "विनूमामा... मी तुला जोक सांगूss ?" आपला गुलाबी फ्रॉक हातात धरून डोलत ती म्हणाली.
"सांss ?" ती पुढे गेल्यामुळं ओरडून बोलावं लागत होतं. तसंही रस्त्यात कोणी नव्हतं, त्यामुळे मलाही तिच्या जोक मध्ये भाग घ्यायला मजा येत होती.
"दोन हत्ती पोहत असतात काय... पण एक हत्ती जातो मग दुसरा बाहेर येतो... दुसरा जातो मग पहिला बाहेर येतो. "
"मगss ?"
"मग त्यांना एक मुंगी विचारतेss... तुम्ही दोघं एकत्र का जात नाई?"
"मगss ?"
"मग... हीहीही... मग तो हत्ती म्हणतो... हीहीही... "तोंडापुढे हात धरून ती आपलं हसू कंट्रोल करू पाहत होती. ते बघून आता मला हसू येऊ लागलं होतं.
"काय म्हणतो हत्ती?" मी पहिल्यांदाच ऐकत असल्यासारखं विचारलं.
"तो म्हणतो... आमच्या दोघांच्यात एकच चड्डी आहे.... हीहीहीही..." ती परत पुढे पळू लागली.
प्लॅटफॉर्म जवळ आला तसं मी तिला म्हणालो, "चिंगे... थांब आपल्याला पुढून जायचंय."
"नक्को विनूमामा... वरून जाऊन प्लिज प्लिज."
आता हिच्यासाठी रुळावरच्या ब्रिजवरून जावं लागणार. मला अजिबात इच्छा नव्हती ते मजले चढून उतरायची. आमच्या गावचा हा प्लॅटफॉर्म म्हणजे ऐतिहासिक नमुना होताब्रिजवर चढून जायच्या पायऱ्यांची शाश्वती नव्हती. ब्रिजवर पेक्षा जास्त माणसं असली तर ब्रिज कोसळेल की काय अशी अवस्था होती, त्यामुळे जास्त कुणी इथून जात नसे. थोडंसं पुढून पायवाट होती तिकडूनच सगळे जायचे. पण ह्या बयोपायी आता हा इंग्रजकालीन ब्रिज चढावा लागणार.    "ठीक आहे... पण माझा हात धरून चल. पुढे पळू नको. तिकडे वर कठडा नाहीए. चिंगे..." पण एवढं ऐकायला ती थांबतेय कुठे, ती पळू लागली. तिने पायऱ्या चढायला सुरुवात केली देखील.
मला आता तिच्यामागे पळण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मला मागून पळत येताना बघून तिने तिचा स्पीड दुप्पट केला.
"*!!" मी वेगात पायऱ्या चढायला सुरुवात केली. "थांब गं ..."
"हीहीही..." ती खिदळत पळत होती.
मजला पळत चढूनच मी दमलो. "चिंगे... हळू पळ... मी नाहीए तुझ्यामागे येत." पण हे ऐकायला ती माझ्या नजरेच्या कक्षात पण नव्हती. थोडासा श्वास घेऊन मी परत पायऱ्या चढू लागलो ,उरलेले दोन मजले चढून मी फायनली वर पोचलो. कठडा नसलेल्या कोपऱ्यालगत ती उभी होती. माझ्याकडे बघून थोडं guilty हसली आणि माझ्याजवळ आली.
"अगं... केवढं पळवलंस मला." मी धापा टाकत म्हणालो.
"सॉरी सॉरी... मी कोकरू येऊ?"
"बरं... चल बस." मी खाली बसलो, तिला कोकरू घेतलं आणि ब्रिजवरून चालू लागलो. अंधारून आल्यामुळे पुलावरचे मिचमिचे दिवे लागले होते. वारा सुटला होता. मी सावकाशच चालत होतो, "चिंगे... तुझ्या आईला मी तुझं नाव सांगणार आहे. तुला फटके दिले ना तर तुला कळेल मोट्ठ्यांचं ऐकायचं."
ती एकदम गप्प झाली.  "आणि आता घरी गेल्यावर TV वर ते फालतू छोटा भीम बघू देणार नाहीए मी तुला. match आहे आज"
"हां..."
"वाह... आज चक्क हां म्हणालीस? आईला नाव सांगणार म्हणल्याबरोबर?" मी तिला घेऊन ब्रिजच्या खाली उतरलो. "उतरतेस का खाली?"
"नको. तिथे ती बाई आहे"
ब्रिजच्या खालच्या दगडी कमानीत एक म्हातारी राहते. इथून जाण्याचं अजून एक कारणदगडी-पांढरे, सोडलेले केस. चेहऱ्यावर आलेले मोठे फोड,पडके दात  ह्यामुळे ती जरा भीतीदायकच वाटते. मी तिला कधीच कुणाशी बोलताना बघितलं नाही. रात्री तिथून कोणी जाऊ लागलं कि ती दगड मारते, त्यामुळे रात्री कोणी जात नाही. म्हातारी आपल्या गाठोड्याजवळ मांडीत डोकं खुपसून बसली होती . माझी जरा फाटलीच होती. दगडी कमानीत एकच पिवळा दिवा होता. मी माझ्या मोबाईलचा लाईट लावायचा विचार केला पण त्याने म्हातारी जागी होईल असा विचार करून मोबाईल परत खिशात टाकला आणि सावकाशीने चालू लागलो. पण चालता चालता वाटेत पडलेल्या पत्र्याच्या छोटया कॅन वर माझा पाय पडलाच. तिने झर्र्कन डोकं वर काढलं.
आईचा घो! मी तिचा चेहरा इतक्या जवळून कधीच पाहिला नव्हता. तिची आणि माझी नजरा-नजर झाली. माझ्या छातीत धस्स झालं. मी जरा पटापट चालू लागलो. तेवढ्यात घोगऱ्या आवाजात ती ओरडू लागली.
"... कुणाला घिऊन चाल्लास. सोड तिला. लांब सोड. अबाबाबा...." तिने तोंडावर हात ठेऊन बोंबलायला सुरुवात केली. माझी चांगलीच टरकली होती. मी तिथून जोरात पळू लागलो. बराच लांब येऊन मी श्वास घेतला. चिंगीने चिक्कार शब्द काढला नव्हता तोंडातून.
"चिंगे... घाबरलीस काय गं?"
"होय... मला वाटलं तू मला सोडून जाशील."
"असा कसा सोडून जाईन. पण डेंजरस आहे हं ती म्हातारी...तुला म्हणलेलं ना आपण पुढून जाऊ. तू ऐकत नाहीस, म्हणून असं होतं."
"मी तुझं सगळं ऐकीन."
"बरं उतर आता खाली."
"नको...  मी तुला आवडते ना?"
"हो...! आवडतेस तू मला."
"मला आईकडं घेऊन चल विनूमामा"
"आँ... अचानक काय झालं तुला? आता नाही... आता अंधार झालाय ,गपचूप घरी चल आमच्या. तिकडेच जेऊन मग बाबांना फोन करू तुझ्या. "
ती एकदम गप्प झाली. "काय? जायचं ना घरी"
"हां.." म्हणून चिंगी मला अजून चिकटली.
"चिंगे जोक सांग की..." ती गप्पच होती.
काय झालं हिला? इतरवेळेस हातसुद्धा धरत नाही कधी आणि आता अंगावरून खाली येईना. तोंडाचा पट्टा कधी बंद नसतो आणि आता एकदम गप्प गप्प.
"काय झालं गं? गप्प का बसलीस?"
"विनूमामा... मी छान दिसते ना?"
"होय चिंगे... असं का विचा..." मी प्रश्न विचारता विचारता तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. तिचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता. डोळ्यांच्या खोबण्या मोठ्या वाटत होत्या. माझ्या गळ्याभोवतीचे तिचे हात पण कोरडे पडले होते. अचानक मला वाटलं कि मगाशीची म्हातारी अजून पण मागून बोंबलतेय.
मी आवंढा गिळला आणि तिला विचारलं, "चिंगे... मगाशी पायऱ्या चढून पळत गेलीस तेव्हा काय झालं? तू तिथे कठड्यालगत थांबलीस ना?"

"नाही विनूमामा मी खाली पडले." ती उत्तरली.