Tuesday, 29 July 2014

पाऊसच… दुसरं काय?

पावसाळा सुरु झाला, पण तरी काहीतरी लिहायचं स्फुरण चढेना. खरंतर शहरातला पाऊसच असा, की त्याच्याकडे बघून साधा शीणही झटकला नाही जात.
शहरात पाऊस 'मापात' पडतो. सकाळी सहाला सुरु झालेली रिपरिप दहाच्या सुमारास बंद होतेमग दहा ते चार ऊन. इथल्या पगारी नोकरदारांसारखाच पाऊसदेखील वेळेची बंधनं पाळतो. गावाकडच्या पावसाची मस्ती त्यात नाही.
गावाकडचा पाऊस जवळ काही ठेवत नाही. भरभरून देतो. मुसळधार कोसळतो. नुसता चिखल ओला करायचा म्हणून नाही पडत. अर्थात तिथल्या लोकांसारखच त्याचा पण 'देता' हात थोडा थोडा आखडू लागलाय म्हणा. पण तरी अजूनही बैठ्या घराची, समोरच्या अंगणाची, मागच्या परसदाराची सय आहे त्याला. दारं दडपलेला 'अपार्टमेंटी' स्वार्थीपणा नाही
धो धो कोसळतो, डोंगरात शुभ्र दुधाळ धबधबा होऊन, नदीच्या वळणावर दुथडीभरून!
शहराकडचा पाऊस धरतीला भेटतो, CCD बसून तिला हळूच 'आय लव यू' म्हणतो. गावाकडे पाऊस काही लाज-बीज बाळगत नाही. कडकडून भेटतो धरतीला. 'अरे, वर्षातनं महिने तर भेटतो मी माझ्या प्रियेला" असं म्हणत चिंब भिजवून टाकतो तिला.
पण गावाकडचा हा रांगडा पाऊस लाजतो देखील बरं का! श्रावणात! त्याची प्रिया अशी नटून-थटून येते की तो एकदम हळुवार होऊन जातो. तिचा हिरवा चुडा उतरेपर्यंत नुसत्याच श्रावणसरींनी  भिजवतो.
श्रावण! वेगवेगळ्या वयात वेगळ्या कारणांसाठी आवडलाय. खरंतर श्रावण हे नावच किती गोड आहे, सोज्वळ आहे. गरम पाण्याने अंघोळ घालून मऊसर कापडात गुंडाळलेल्या बाळासारखा वाटतो मला श्रावण. ताजातवाना, गोंडस आणि निरागस.
लहानपणी श्रावण साबुदाण्याची खिचडी आणि राजगिऱ्याच्या लाडवासाठी आवडायचा. 'कळत्या-नकळत्या' वयात तो 'हर्ष मानसी' देऊन जायचा. घराजवळच्या ओढ्याच्या काठावर एक छोटंसं, हिरवट-पोपटी पानांचं झाड होतं, असा थोडासा सरींचा शिडकावा होऊन गेल्यानंतर फिरून ऊन पडायचं, तेव्हा ते झाड चमकायचं. त्याच्याकडे बघून मला रोज इतका आनंद व्हायचा जो शब्दांत बांधता नाही येणार. आणि त्यातून एखादा इंद्रधनू डोकावला तर मग पंखच फुटायचे आनंदाला.
आजकाल गावाकडच्या पावसाला भेटता येत नाही. पण त्याच्या आठवणी सुद्धा भिजवून जातात. इथल्या पावसाला सांगावसं वाटतं, अरे घे थोडासा बेभानपणा, दिलदारपणा त्या गावातल्या पावसाकडून. कोसळ मनसोक्त. धुवून काढ इथला धुवटपणा. कोंदट घराच्या बाहेर ओढून आण  इथल्या माणसांना. चिंब भिजायला लाव. मातीचा नाही तरी सुखाचा वास काय असतो हे तरी कळेल!